“येणाऱ्या काळात महाविकास आघाडी सरकारला हद्दपार करणार”

मुंबई | येणाऱ्या काळात महाराष्ट्रामध्ये भाजपाची सत्ता येणार असून, आम्ही महाविकास आघाडी सरकार उलथून टाकू, असं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी म्हटलं आहे. ते मुंबईमध्ये माध्यमांशी बोलत होते.

दरम्यान जेपी नड्डा यांचे आज सकाळी मुंबई विमानतळावर आगमन झाले. नड्डा विमानतळावर येताच राज्य भाजपाच्या वतीने त्यांचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

स्वागत समारंभ पार पडण्यानंतर जेपी नड्डा हे ठाणे जिल्ह्यातील उत्तन येथील रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीकडे निघाले आहेत. मुंबईमध्ये आसाममधील भाजपा आमदारांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले असून, उद्या नड्डा यांच्या हस्ते या प्रशिक्षण शिबिराचे उद्घाटन होणार आहे. यावेळी जेपी नड्डा हे भाजपाच्या नेत्यांना संबोधित करतील.

दरम्यान महाविकास आघाडी सरकार हद्दपार करू, असे वारंवार राज्यातील भाजप नेत्यांकडून ऐकायला मिळते. मात्र आता खुद्द भाजपाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी देखील हद्दपारीची भाषा केल्याने, राजकीय वर्तृळात चर्चेला उधाण आलं आहे.

आमचं सरकार स्थिर असून, पुढील निवडणुकीपर्यंत आम्हीच सत्तेत राहाणार असल्याचं महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि नेते सांगत आहेत.

दरम्यान, याआधीही महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडण्याचं वक्तव्य नड्डांनी भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत केलं होतं. यानंतर संजय राऊतांनी नड्डांना अग्रलेखातून प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी अत्यंत राष्ट्रहिताचे, राष्ट्रीय सुरक्षेचे, महागाईविरोधी असे विचार ठणकावून व्यक्त केले म्हणजे काय? महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार उखडून फेका, असा फुसका बॉम्ब त्यांनी फेकला, अशी टीका त्यांनी केलीये.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार उखडण्याची भाषा भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत केलीच आहे म्हणून सांगायचं. अरुणाचल प्रदेशात 4-5 किलोमीटरपर्यंत घुसखोरी करून चीनने 100 घरांचे एक गावच वसवलं आहे. चीनची ही सरळ सरळ घुसखोरीच आहे. हे गाव आधी उखडून फेका, असं संजय राऊतांनी म्हटलंय.

चीनची ही सरळ सरळ घुसखोरीच आहे. हे गाव आधी उखडून फेका, मग महाराष्ट्र विकास आघाडी उखडायची भाषा करा. सतत दोन वर्षे शर्थ करूनही ठाकरे सरकार मजबूत आहे. दुसऱ्यांना उखडता–उखडता एक दिवस तुम्हीच मुळापासून उखडले जाणार नाहीत ना? तेव्हा जरा जपून, असंही संजय राऊत म्हणालेत.

भाजप जनतेचा विश्वास जिंकेल, असे मनोगत पंतप्रधान मोदी यांनी त्यांच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत व्यक्त केलं आहे. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत नक्की काय घडेल याविषयी बरेच तर्कवितर्क होते, पण पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका कशा जिंकायच्या यावरच प्रामुख्याने चर्चा झाली. पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुका जिंकू म्हणजे जिंकूच, असाच राष्ट्रीय कार्यकारिणीचा सूर होता, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

‘या’ शेअरने गुंतवणूकदारांना केलं मालामाल; 1 लाखांचे बनले 1 कोटी

 “राज्यात बिग बॉसचा शो सुरू आहे की काय? अशी शंका येते”

“भाजप नेत्यांवरील ईडी कारवाईचं काय झालं?, आम्ही जाब विचारणार” 

हिंदुत्वाची तुलना ISIS शी करणं चुकीचं- गुलाम नबी आझाद

 “अंगार विसरलेले मुख्यमंत्री सध्या भंगाराचं कौतुक करतात”