जसप्रीत बुमराह येते दोन महिने खेळणार नाही; BCCI ने घेतला ‘हा’ मोठा निर्णय

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीने संघातून बाहेर आहे. स्ट्रेस फ्रॅक्चर झाल्याने बुमराह पुढचे दोन महिने खेळू शकणार नाही. त्याला दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकेला मुकावं लागणार आहे. त्याच्या कारकिर्दीत पहिल्यांदाच त्याला दुखापतीमुळे इतका काळ संघातून बाहेर रहावं लागणार आहे.

बुमराहची दुखापत लवकर बरी व्हावी यासाठी बीसीसीआयने पावलं उचलली आहेत. उपचारासाठी बुमराहला लंडनला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं बीसीसीसीआय़च्या एका अधिकाऱ्याने म्हटलं आहे. त्याच्यासोबत एनसीएचे फिजिओथेरपिस्ट आशिष कौशिक असतील.

तीन वेगवेगळ्या तज्ज्ञांकडून बुमराह सल्ला घेणार आहे. बुमराह सहा ते सात ऑक्टोंबरला एक आठवड्यासाठी इंग्लंडला रवाना होऊ शकतो. पुढचा उपचार तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्यानुसार होणार आहे.

भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिका खेळायची आहे. यामध्ये बुमराहची उणीव भासेल. बुमराहने गेल्या दोन वर्षांत संघाच्या गोलंदाजीची धुरा पेलली आहे. त्यानं 12 कसोटीत 62 गडी बाद केले आहेत. त्याशिवाय 58 एकदिवसीय सामन्यात 103 तर 42 टी20 मध्ये 51 गडी बाद केले आहेत.

बुमराहच्या अ‌ॅक्शनमुळे त्याला दुखापत झाल्याचं काहींनी म्हटलं होतं. त्यावर भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराने असं काही नसल्याचं म्हटंल आहे. बुमराह किती वेळेत तंदुरुस्त होईल हे मात्र सांगता येत नाही. त्याला दोन ते सहा महिन्याचा कालावधीही लागू शकतो असं नेहरानं सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-