“…नाहीतर शशी थरूर यांची पक्षातून हकालपट्टी केली जाईल”

नवी दिल्ली | केरळमधील ‘सेमी-हायस्पीड रेल्वे कॉरिडोअर’च्या विरोधात काँग्रेस(Congress) खासदारांनी केंद्र सरकारला लिहिलेल्या पत्रावर काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरुर(Shashi Tharoor) यांनी सही करण्यास नकार दिला. त्यानंतर थरुर यांनी उघडपणे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांचं कौतुक केलं. यामुळे सध्या थरुर यांना राज्यामधील स्वपक्षीय नेत्यांच्या रोषाला सामोरं जावं लागत आहे.

शशी थरुर किंवा पक्षाच्या इतर कोणत्याही सदस्याला पक्षाचे निर्देश नाकारण्याचा अधिकार नसल्याचं म्हणत काँग्रेसचे केरळ प्रदेश काँग्रेस कमेटीचे अध्यक्ष के. सुधारन यांनी शशी थरूर यांच्यावर निशाणा साधला आहे.

थरुर हे काँग्रेसच्या निर्णयांच्या मर्यादेत नाही राहिले तर पक्षामधून त्यांची हकालपट्टी केली जाईल असंही के सुधारन यांनी म्हटलं आहे. ते रविवारी आयोजित एका पत्रकार परिषदेत बोलत होते.

पक्षाचा आदेश नाकारण्याचा अधिकार नाहीय. पक्षाने असा अधिकार कोणालाच दिलेला नाही. अगदी खासदारांनाही हा अधिकार पक्षाकडून देण्यात आलेला नाही, असं सांगत सुधारन यांनी पत्रकार परिषेदत शशी थरूरांना चांगलंच झापलं आहे.

शशी थरुर हे पक्षामधील एक व्यक्ती आहेत. एक शशी थरुर म्हणजे काँग्रेस पक्ष नाही. ते पक्ष निर्णयाच्या मर्यादेत राहिले तर ते पक्षाचे सदस्य असतील. जर त्यांनी पक्षाचे निर्णय नाकारले तर त्यांना पक्षातून बाहेर काढलं जाईल, अशा इशारा सुधारन यांनी शशी थरूर यांनी दिला आहे.

दरम्यान, केरळमधील काँग्रेस आणि यूडीएफचे खासदार या बैठकीला उपस्थित न राहिल्यानंतर थरूर यांनी सांगितलं होतं की, प्रस्तावित हाय-स्पीड रेल्वे प्रकल्पाच्या नकारात्मक परिणामांचा अभ्यास करण्यासाठी त्यांना अधिक वेळ हवा असल्याने मी बैठकीला उपस्थित राहिलो नाही.

या प्रकल्पामुळे राज्याचे पर्यावरण आणि आर्थिक नुकसान होत असल्याचं कारण देत काँग्रेस हायस्पीड रेल्वे प्रकल्पाविरोधात प्रचार करत आहे. सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा हा प्रकल्प पाच वर्षांत पूर्ण करण्याचा प्रस्ताव आहे, असं शशी थरूर यांनी सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या- 

‘मोहनदास करमचंद गांधीनं सत्यानाश केला’; कालीचरण महाराजाचं वादग्रस्त वक्तव्य 

विषारी साप मला तीन वेळा चावला, सापाने मला बर्थडे गिफ्ट दिलं- सलमान खान 

‘या’ अवयवांवर आक्रमण करतोय कोरोना, वेळीच व्हा सावध! 

“…तर देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लावला जाऊ शकतो” 

नितेश राणेंच्या अटकेसाठी प्रयत्न केले जातायेत – नारायण राणे