पुणे | मराठी माणूस कुठे काय करेल याचा नेम नाही. रविवारी ऐतिहासिक लॉर्डस क्रिकेट ग्राऊंडवर विश्वचषकाचा अंतिम सामना चालू होता. या सामन्याला काही मराठी लोकांनी देखील उपस्थिती लावली होती. परंतू मैदानात आंबाजोगाई जिल्हा झालाच पाहिजे, असा नारा अधून-मधून एक मराठी व्यक्ती देत होता. याचाच व्हीडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे.
हे घोषणा देणारे व्यक्ती होते अंबाजोगाईतीलच डॉ. आदित्य पतकराव. एका पुरस्कार सोहळ्यासाठी ते लंडनला गेले होते.
त्यांच्या नियोजनातील एकूण कार्यक्रम संपल्यानंतर त्यांनी लॉर्डसवर क्रिकेटचा आस्वाद घेण्यासाठी हजेरी लावली. पण सामना चालू असताना त्यांच्या कृत्याने ते चांगलेच चर्चेत आहेत.
लॉर्डवरील उपस्थित सर्व प्रेक्षक आपापल्या खेळाडूंना आणि संघाला प्रोत्साहान देत होते. मात्र पतकराव यांना आपल्या शहराचा जिल्हा व्हावा, असं मनोमन वाटतं होतं. आणि याच अपेक्षासह त्यांनी त्या घोषणा दिल्या.
डॉ. आदित्य पतकराव हे पुण्यातील नावाजलेले दंतचिकित्सक आहेत. त्याचबरोबर ते वेळोवेळी सामाजिक भूमिका देखील घेत असतात.
दरम्यान, व्हायरल झालेला व्हीडिओ महाराष्ट्रीयन लोकं मोठ्या प्रमाणावर शेअर करत आहेत. आणि त्यांच्या व्हीडिओवर कमेंटसचा अक्षरश: पाऊस पडला आहे.