पुणे महाराष्ट्र

शेतकऱ्यानं दुग्ध विकासमंत्री महादेव जानकरांना फोन करुन शिव्या हासडल्या

अहमदनगर : दूध दरवाढीच्या मुद्द्यावर नगरच्या एका शेतकऱ्यानं थेट दुग्ध विकासमंत्री महादेव जानरकर यांना फोन करुन शिव्या हासडल्या आहेत. महादेव जानकर यांनी यासंदर्भात नगर पोलिसांकडे तक्रार केली आहे.

नगरच्या मांडवे येथील शेतकरी सदाशिव निमसे यांनी महादेव जानकर यांना फोन केला होता. जानकर यांनी पहिल्यांदा फोन उचलला नाही. निमसे यांनी दुसऱ्यांदा फोन केल्यानंतर जानकर यांनी तो उचलला. त्यावेळी निमसे यांनी शिव्या दिल्याचा जानकर यांचा आरोप आहे. 

निमसे यांचा फोन येऊन गेल्यानंतर महादेव जानकर यांनी थेट नगरचे पोलीस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांना फोन केला. निमसे यांनी केलेल्या शिवीगाळीची त्यांनी शर्मांना माहिती दिली. मंत्रिमहोदयांना शिव्या दिल्याने पोलिसांनी ही बाब गांभीर्याने घेतली असून कारवाईचे आदेश दिले आहेत. 

पोलिसांनी यासंदर्भात निमसे यांच्या घरी जाऊन चौकशी केली. निमसेंच्या वडिलांना यासंदर्भात कल्पना दिली, असं पोलिसांचं म्हणणं आहे. निमसे सध्या फरार आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचं एक पथक त्यांच्या मागावर असून ते सापडल्यावर त्यांची चौकशी केली जाईल, असं रंजनकुमार शर्मा यांनी म्हटलंय.

विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाचा विधान परिषदेत उल्लेख केला होता. दुग्ध विकासमंत्र्यांना फोन केला म्हणून पोलिसांनी रात्री शेतकऱ्याच्या 55 वर्षीय वडिलांना उचलून नेलं. त्यांना त्रास दिला, असा आरोप धनंजय मुंडे यांनी केला होता. काम केलं नाही तर लोक आम्हालाही शिव्या देतात असं त्यांनी म्हटलं होतं. 

IMPIMP