…तर जम्मू काश्मीर भारताशी नातं तोडेल; मेहबुबा मुफ्तींची भारताला धमकी

जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी भारत सरकारला थेट धमकी दिली आहे. जर काश्मीरमधून कलम 370 आणि 35A हटवलं तर जम्मू-काश्मीर भारताशी नातं संपवेल, असं मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. ही दोन्ही कलमं राज्याची एक वेगळी ओळख आहे. याला कोणत्याही किंमतीवर आम्ही कायम ठेवू, असंही त्या म्हणाल्या आहेत. 

भाजपच्या पाठिंब्यानं होत्या मुख्यमंत्री

पीडीपीच्या अध्यक्ष असलेल्या मेहबुबा मुफ्ती या काश्मीरच्या मुख्यमंत्रीही होत्या. भाजपच्या पाठिंब्यानं जम्मू काश्मीरमध्ये त्यांचं सरकार होतं. मात्र भाजपनं पाठिंबा काढल्यानं नुकतंच त्यांचं सरकार पडलं. मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर त्या पहिल्यांदाच राजौरीच्या दौऱ्यावर आल्या होत्या.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा समाचार-

राजौरीच्या दौऱ्यात त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा चांगलाच समाचार घेतला. जम्मू-काश्मीरमधील स्थिती सामान्य करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाटेवर चालावं लागेल, असं त्या म्हणाल्या. 

मोदींनी पाकिस्तानला मैत्रीचा हात द्यावा-

दक्षिण आशियात शांती प्रस्तापित करण्यासाठी भारत आणि पाकिस्तान यांमध्ये संवाद असणं अनिवार्य आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांना मैत्रीचा हात द्यावा, असं देखील मेहबुबा मुफ्ती यांनी म्हटलं आहे. 

काय आहे परिच्छेद 35A मध्ये?

परिच्छेद 35A 1954 मध्ये राष्ट्रपतीच्या आदेशाने संविधानात समाविष्ट करण्यात आले. यानुसार जम्मू आणि काश्मीरच्या नागरिकांना विशेष अधिकार प्राप्त झाले आहेत. या कलमानुसार राज्याबाहेरील व्यक्ती जम्मू काश्मीरमध्ये स्थावर मालमत्ता खरेदी करु शकत नाही. एखाद्या महिलेने जर राज्याबाहेरील व्यक्तीशी विवाह केला असेल तर राज्यातील कोणतीही व्यक्ती त्या महिलेला संपत्तीच्या अधिकारापासून बेदखल करू शकतो. ही तरतूद त्याच्या मुलांना देखील लागू होते.