“शिवसेनेने फक्त माझं तिकीटच कापू द्या… माझा समाज धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही”

करमाळा |  राष्ट्रवादीच्या नेत्या रश्मी बागल यांनी राष्ट्रवादीला रामराम करून थेट शिवसेनेचा झेंडा हाती घेतला. युतीच्या जागावाटपात करमाळ्याची जागा शिवसनेकडे आहे. या मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान आमदार नारायण पाटील आहेत. जागावाटपात ही जागा शिवसेनेकडे असताना रश्मी बागलांनी शिवसेनेची निवड का केली? रश्मी बागल कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवणार याबाबत संबंध महाराष्ट्राला उत्सुकता आहे. यातच रश्मी बागलांनी आगामी निवडणूक करमाळ्यातून लढविण्याची इच्छा व्यक्त केली.

रश्मी बागल यांच्या वक्तव्याने नवा वाद पेटला आहे. रश्मी बागलांना उमेदवारी दिली तर थेट बंडखोरीची भाषा विद्यमान आमदारांनी केली. उमेदवारी डावलली तर धनगर समाज पक्षालाच धडा शिकवेल, असा सूचक इशारा नारायण पाटील यांनी शिवसेनेला दिला.

निवडणुकीच्या तोंडावर विरोधी पक्षाकडे उमेदवारीचा पत्ता नसताना शिवसेनेतल्या नेत्यांचा आमदारकीच्या तिकिटाचा हा वाद इथेच संपला नाही. आमदार नारायण पाटील यांनी आम्हाला दोघांना तिकीट न देता थेट जलसंधारण मंत्री तानाजी सावंत यांनी निवडणूक लढवावी असा सल्लाही दिलाय.

दरम्यान, मंत्री तानाजी सावंत यांचे बंधू आणि शिवसेनेचे जिल्हा समन्वयक शिवाजी सावंत यांनीही नारायण पाटलांनी कानपिचक्या दिल्या. तिकीट वाटप करणारे नारायण पाटील नाहीत, तर तिकिटाचा निर्णय शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेच घेतील, असंही ते म्हणाले.

आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उद्धव ठाकरे यांनी बाहेरून येणाऱ्या नेत्यांच्या हातात शिवबंधन बांधलंय खरं, मात्र तिकीट वाटपावरून शिवसेना नेत्यांतच अंतर्गत कलहाची नांदी सुरू झाली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे उमेदवारीची माळ नेमकी कोणाच्या गळ्यात टाकतात आणि स्थानिक नेते ‘मातोश्री’चा आदेश कितपत मानतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-