आगामी निवडणुकीत राज ठाकरेंची ‘मनसे’ कोणत्या पक्षासोबत जाणार?

आगामी निवडणुकीत मनसे कोणत्या पक्षासोबत जाणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांना यासंदर्भात ‘ट्विटरकट्ट्या’वर यासंदर्भातच प्रश्न विचारण्यात आला होता. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी या प्रश्नाला दिलेलं उत्तर आता चांगलंच चर्चेत आहे.येत्या विधानसभा निवडणुकीत मनसे कोणत्या इतर पक्षासोबत युती करून लढेल का? त्यासाठी काही प्रयत्न चालू आहेत का?, असा प्रश्न वैष्णवी नावाच्या यूझरने विचारला होता.

संदीप देशपांडे यांनी काय उत्तर दिलं?

संदीप देशपांडे यांनी या प्रश्नाला रिट्विट करत उत्तर दिलं आहे. त्यांनी अत्यंत चतुराईने या प्रश्नाचं उत्तर दिलं. सगळीच गुपितं उघड करायची नसतात, असं उत्तर त्यांनी या प्रश्नावर म्हटलं आहे. संदीप देशपांडे यांनी या प्रश्नाला नकारार्थी उत्तर दिलं नाही त्यामुळे या उत्तराची सध्या चांगलीच चर्चा आहे.

मनसे कोणत्या पक्षासोबत जाणार?

कोणत्या पक्षासोबत जाण्याची मनसेची तयारी सुरु आहे ते मात्र कळू शकलेलं नाही, मात्र सध्या मोदींविरोधात राज ठाकरे यांनी टीकेची झोड उठवली आहे. त्यामुळे राज ठाकरे भाजपसोबत जाण्याची सध्या तरी सुतराम शक्यता नाही. शिवसेनेतून बाहेर पडून त्यांनी मनसेची स्थापना केली आहे तसेच शिवसेनेत झालेला अपमान ते अद्याप विसरलेले नाहीत त्यामुळे त्यामुळे ते शिवसेनेसोबत जाण्याचीही कोणतीच शक्यता नाही. 

स्वतंत्र लढणार की विरोधकांना मिळणार?

मोदींविरोधात सध्या विरोधकांनी देखील रान पेटवण्यास सुरुवात केली आहे. मोदी विरोध हा राज ठाकरे आणि विरोधकांमधील समान धागा आहे त्यामुळे राज ठाकरे विरोधकांच्या गोटात सामील होण्याची शक्यता वर्तवली जातेय. राज ठाकरेंचं स्वतंत्र लढण्याला देखील प्राधान्य असू शकतं मात्र याआधीच्या निवडणुकांमध्ये त्यामुळे जास्त काही हाती लागलं नाही हा त्यांचा अनुभव आहे.