‘मुंबईची हालत खूप खराब झाली आहे अन्….’; कोरोना परिस्थितीविषयी बोलताना महिला डाॅक्टरला कोसळलं रडू

मुंबई| सध्या राज्यात कोरोना संसर्गाचा आता उद्रेक पाहायला मिळत आहे. दररोज मोठ्या संख्येने कोरोनाबाधित रूग्ण आढळून येत असून, रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही मोठी भर पडताना दिसत आहे. अशातच देशात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. ही लाट अधिक भयंकर असल्याचं सांगितलं जातं आहे. कोरोनाचे संकट महाराष्ट्रात दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले आहे. देशात अनेक ठिकाणी पुन्हा कडक निर्बंध, लॉकडाऊन लावला जात आहे. विशेष काळजी घेण्याचा सल्ला दिला जात आहे.

दुसरीकडे देशातील राजकारण देखील दिवसेंदिवस विकोपाला जात आहे. औषधे, ऑक्सिजन यांचा पुरवठा अपुरा पडत आहे. जवळपास सगळ्याच राज्यांची हालत खराब आहे.

अशातच मुंबईतील कोरोनाची भयाण परिस्थिती सांगताना तर मुंबईतील एका तज्ज्ञ डॉक्टरलाही रडूच कोसळलं. मुंबईतील संसर्गजन्य आजारांच्या तज्ज्ञ डॉ. तृप्ती गिलाडा कोरोनाची सद्यस्थिती सांगत असताना त्यांना अश्रू अनावर झाले. त्यांचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे.

डॉ. तृप्ती गिलाडा म्हणाल्या, ‘सध्याची स्थिती अशी आहे की मी याआधी कधीच पाहिली नाही. सगळ्या डाॅक्टर्सप्रमाणे मीदेखील खूप चिंतेत आहे. काय करावं ते समजत नाही. अशातच मुंबईची हालत तर खूपच खराब आहे. मला एवढं हतबल, लाचार झाल्यासारखं कधीच वाटलं नाही. आम्हाला अनेक रुग्णांना घरी उपचार द्यावे लागत आहे.’ हे सांगताना तृप्ती यांना अश्रू अनावर झाले.

‘मी तुम्हाला सगळ्यांना विनंती करते की, कृपया करुन तुम्ही काही गोष्टींचं अनुसरण करा. तुम्हाला वाटतं की तुम्हाला वर्षभर कोरोना झाला नाही. म्हणजे तुम्ही सुपरहिरो आहात. तुमची रोगप्रतिकारक शक्ती चांगली आहे तर असं बिलकुल नाही. आम्ही अनेक तरुणांना पाहतो आहोत. अगदी 35 वयातील लोकही वेंटिलेटरवर आहेत. जगण्यासाठी धडपडत आहेत’, असं डॉ. तृप्ती यांनी सांगितलं.

पुढे त्या म्हणाल्या की, ‘तुम्हाला ताप आला तर पॅनिक होऊ नका. लगेच रुग्णालयात दाखल होऊ नका. असं घाबरून अनेक लोक रुग्णालयात दाखल होत आहेत. त्यामुळे आणि ज्यांना खरंच गरज आहे त्यांना बेड्स मिळत नाहीत.’

स्वतःची काळजी घ्या. कोविड तुमच्या आजूबाजूला सर्वत्र आहे. तुम्ही घराबाहेर पडाल तेव्हा तुम्ही मास्क घालायलाच हवा. तुम्हाला कोरोना झाला नाही किंवा झाला असेल तरी तुम्हाला कोरोना होणार नाही असं नाही. शिवाय लसही घ्या. असं आवाहनही डॉ. गिलाडा यांनी केलं आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाचा हाहा:कार पाहायला मिळत आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू राज्य सरकारने कडक निर्बंध लागू केले आहेत. मात्र तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने राज्यातील लॉकडाऊनचे नियम आणखी कठोर केले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्रात आज कडकडीत लॉकडाऊनची घोषणा करतील, अशी चर्चा आहे.

महत्वाच्या बातम्या – 

चाहता फोटो काढायला आला अन् अभिनेत्रीला किस करुन गेला!…

अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचे निधन

IPL 2021: अटीतटीच्या सामन्यात दिल्लीचा मुंबईवर 6 विकेट्सने…

‘या’ कारणामुळे बाबिलनं वडिल इरफान खानच्या आठवणी…

ज्येष्ठ अभिनेते किशोर नांदलस्कर यांचं कोरोनामुळे निधन