महाराष्ट्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग

…म्हणून नारायण राणेंचा थेट भाजपशी पंगा; खासदारकी सोडण्याचीही तयारी!

मुंबई : नाणार प्रकल्पावरुन भाजप आणि शिवसेनेचे संबंध ताणले गेलेले आहेत. आता याच प्रकल्पावरुन खासदार नारायण राणे आक्रमक झाले आहेत. त्यांनी थेट भाजपला इशारा दिला आहे. नाणार प्रकल्प झाला तर खासदारकीचा राजीनामा देईन, असं नारायण राणे यांनी म्हटलं आहे. 

कोणत्याही परिस्थितीत नाणार प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही. कोकणी माणसावर कुणीही हा प्रकल्प लादण्याचा प्रयत्न करु नये. वेळ पडली तर मी माझ्या राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा देईन, अशी भूमिका नारायण राणे यांनी घेतली आहे. त्यांच्या या भूमिकेमुळे भाजपच्या अडचणी मात्र वाढल्या आहेत. 

उद्योगपतींच्या बैठकीत शिवसेनेला डावललं-

शिवसेना आणि माझ्यात फरक आहे. त्यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत. माझं तसं नाही. मोदींनी मुंबईत उद्योगपतींची बैठक घेतली. उद्योगमंत्री सुभाष देसाईंना या बैठकीचं निमंत्रण नव्हतं. या प्रकारावरुन सरकारमध्ये शिवसेनेला किती महत्त्व आहे ते कळते, असं नारायण राणे म्हणाले. नाणार प्रकरणी शिवसेना पोकळ धमक्या देत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे.