’25 वर्ष आम्ही नको ती अंडी उबवली’; उद्धव ठाकरेंच्या टीकेवर निलेश राणे म्हणतात…

मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अटल इनक्युबेशन सेंटरचं उद्घाटन करण्यात आलं. याप्रसंगी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा नेते शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होते. यावेळी बोलताना त्यांनी जोरदार फटकेबाजी केली.

आम्हीही नको ती अंडी उबवली. त्याचं पुढे काय झालं ते तुम्ही बघत आहात. अशा गोष्टी घडत असतात. आपलं काम आपण केलं. पुढे काय करायचं हे त्यांनी ठरवायचं असतं, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपवर निशाणा साधला होता.

उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला भाजप नेते निलेश राणेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. मुख्यमंत्री काय बोलतात हे कळत नाही. त्यांचे बोलणे समजण्यासाठी ट्रान्सलेटर लागतो, असं निलेश राणेंनी म्हटलंय.

25 वर्षे स्वर्गीय बाळासाहेबांनी सेना-भाजप युती जपली, उद्धव ठाकरे यांनी नाही. सेनेचे भाजपवर आणि भाजपचे सेनेवर प्रेम होते. यात उद्धव ठाकरे कुठेच नव्हते. त्यामुळे त्यांना युतीवर भाष्य करण्याचा अधिकार काय? असा सवाल निलेश राणेंनी केलाय.

1995 पर्यंत उद्धव ठाकरे यांच्या हातात कॅमेराच होता, ते जंगलात फिरत होते. भाजपशी उद्धव ठाकरे यांचा काय संबंध. तुटलं काय किंवा जुळलं काय. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांसारखं बोललं पाहिजे, असंही निलेश राणे म्हणाले.

तुम्ही यासाठी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून ट्रेनिंग घ्या. कारण तुम्ही नारायण राणेंकडून ट्रेनिंग घेणार नाहीत. त्यानंतर बोलायला शिका आणि मग कुणी 25 वर्षे अंडी उबवली त्यावर भाष्य करा, असं निलेश राणेंनी म्हटलं.

2024 मध्ये महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला अंडी उबवण्यासाठी ठेवलंय हे कळेल, असा जोरदार टोला निलेश राणेंनी लगावलाय.

नबाव मलिक यांच्यावरही निलेश राणेंनी हल्ला चढवलाय. नवाब मलिकांची अवस्था पिसाळल्यासारखी आहे. ते काय बोलतात त्याला अर्थ नसतो. त्यांची वक्तव्य महाराष्ट्राच्या हिताची नाहीत, अशी टीका त्यांनी केलीये.

जावयाला वाचवण्यासाठी, त्याच्या प्रेमापोटी त्यांची ही वक्तव्य सुरु आहेत. एका अधिकाऱ्याची तुम्हाला हकालपट्टी करायची आहे. पण ती होत नसल्याचं रोज आरोप सुरु आहेत, असंही ते म्हणाले.

जावयाला अटक केली म्हणून अधिकाऱ्यावर वचपा काढायचा आहे. तुमचा न्यायव्यवस्थेवर विश्वास नाही का? असा सवाल निलेश राणे यांनी मलिकांना विचारलाय.

महत्त्वाच्या बातम्या-

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; सरकारने दिली पुन्हा एकदा दिवाळीची भेट 

 “शिवसेनेच्या कामगिरीसाठी त्यांना शुभेच्छा, आम्हाला दु:ख वाटण्याचं कारण नाही”

“नवाब मलिक आणि त्यांनी आरोप केलेल्यांची नार्को टेस्ट करा” 

पराभवानंतर सुभाष साबने यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले… 

“मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही, कोरोनावर एकच उपाय…”