बॉर्डर सिनेमाचं ‘संदेसे आते है’ हे गाणं माहीत नसेल असा व्यक्ती भारतात तरी शोधून सापडणार नाही. या गाण्याची लोकप्रियता आजच्या घडीलाही कायम आहे. एकही 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी या गाण्याशिवाय जात नाही. आता अशाच प्रकारचं एक नवंकोरं गाणं प्रदर्शित झालं आहे. पलटन सिनेमात हे गाणं पहायला मिळणार आहे.
‘रात कितनी’ असं या गाण्याचं शिर्षक आहे. हे गाणं पाहिल्यावर पाहिल्यावर तुम्हाला बॉर्डर किंवा LOC कारगील या सिनेमांची आठवण आल्याशिवाय राहणार नाही.
गायक सोनू निगमनं या गाण्याला आवाज दिला आहे. अन्नू मलिक यांचं संगीत आहे तर जावेद अख्तर यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. ही तिकडी या गाण्याच्या निमित्ताने पुन्हा एकत्र आली असून एक जादूई गाणं तयार केलंय.
आपल्या कुटुंबाला मागे सोडून सीमेवर लढण्यासाठी जाणाऱ्या सैनिकाची विविध रुपं या गाण्यात पाहायला मिळत आहे. देशसेवेसाठी दक्ष असणारा सैनिक साकारणाऱ्या एखाद्या व्यक्तीच्या मनात नेमका भावनांचा समुद्र कशा प्रकारे उसळत असतो, याचं चित्रण गाण्यात आहे. भारत आणि चीन सैन्यादरम्यान 1967 मध्ये झालेल्या नथुला संघर्षावर ‘पलटन’ची कथा आधारित आहे.