आगामी मुख्यमंत्री वंचितचाच असणार पण मी….- प्रकाश आंबेडकर

मुंबई |  आगामी विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री वंचितचाच असणार पण मी मुख्यमंत्रीपदाचा दावेदार नाहीये, असं भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत. तसेच विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं आहे.

काँग्रेसच्या वागणुकीत अजूनही फरक नाही. काँग्रेस आघाडीसाठी लोकसभेसारखंच वागतंय. आम्ही काँग्रेसला प्रस्ताव दिलाय मात्र ते कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देत नाही. आमची काँग्रेससोबत जाण्याची इच्छा नाही, असं ते म्हणाले.

आगामी विधानसभेची तयारी आणि भारिपची भूमिका स्पष्ट करण्यासाठी प्रकाश आंबेडकरांनी मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर पत्रकारांशी संवाद साधला.

फॉर्म भरण्याच्या शेवटच्या दिवसांपर्यंत आमचा एमआयएमसोबत युतीचा प्रयत्न राहील, अशी भूमिका आंबेडकरांनी घेतली आहे. तर आमचा फुटबॉल होऊ नये म्हणून गणेश विसर्जनानंतर आमची यादी जाहीर करु, असंही ते म्हणाले.

दरम्यान, मी EVM विरोधाचा मुद्दा सोडलेला नाही. एका हॅकरने माझ्याशी संपर्क साधला आहे. पुढच्या काळात मी कोर्टात EVM हॅकिंगचा मुद्दा मांडणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या-