‘लस नाही, तर रेशनही नाही’; ‘या’ भागात नवे आदेश

नाशिक | राज्यात कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. कोरोनाला आळा घालायचा असेल तर संपूर्ण लसीकरण आवश्यक असल्याचं अनेक तज्ज्ञांचं मत आहे.

कोरोना प्रतिबंधक लस कोरोनाविरोधात कितीही प्रभावी असली तरी अनेक लोक अजूनही लसीकरणाकडे पाठ फिरवत आहेत. जास्तीत जास्त लोकांनी लस घ्यावी यासाठी प्रशासनाकडून अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत.

आता लस न घेतलेल्या नागरिकांना रेशन देखील मिळणार नाही. आता लस नाही तर रेशनही नाही, असा नवा नियम नाशिकमध्ये लवकरच लागू होणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. नाशिकमधील कोरोना रूग्णांची वाढती आकडेवारी बघता नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी नाशिक जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेतला.

कोरोना परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर छगन भुजबळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला. लसीकरण नसेल तर रेशन मिळणार नाही, लवकरच नाशिकमध्ये याची अंमलबजावणी केली जाणार आहे, अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राज्यातही असा कटू निर्णय स्थानिक परिस्थिती पाहून घ्यावा लागू शकतो. हा सर्व राज्यांसाठी इशारा आहे, असं वक्तव्य देखील छगन भुजबळ यांनी केलं आहे.

यापुढे नाशिकमध्ये दोन्ही डोस घेतलेल्यांनाच सार्वजनिक ठिकाणी प्रवेश दिला जाणार आहे. लसीकरण करा, कठोर निर्बंध लावण्यास भाग पाडू नका, असा गंभीर इशारा छगन भुजबळ यांनी दिला आहे.

नाशिक जिल्ह्यात यापुढे नो वॅक्सिन, नो एंट्री लागू करणार असल्याचंही छगन भुजबळ म्हणाले.नाशिकमध्ये कोरोनाबाधित रूग्णांची संख्या कितीतरी पटीने वाढल्याने कठोर पावलं उचलली जात आहेत.

दरम्यान, नाशिकमध्ये 28 डिसेंबरला 540 कोरोना रूग्ण होते. ही आकडेवारी वाढून आता 1500च्या आसपास गेली आहे. त्यामुळे नाशिकमध्ये स्थानिक प्रशासनाकडून निर्बंध कडक केले जात आहेत.

महत्वाच्या बातम्या-

बूस्टर डोसबाबत नवी नियमावली जाहीर, वाचा काय आहेत नियम

‘तिसरी लाट सौम्य असण्याची शक्यता, मात्र…’; तज्ज्ञांचा इशारा

चिमुकल्याच्या हुशारीमुळे वाचला आईचा जीव, आई बेशुद्ध झाल्यावर केलं असं काही की…

बापरे! राज्यात कोरोनाचा धुमाकूळ, गेल्या 24 तासात रूग्णसंख्येत लक्षणीय वाढ

मुंबईत लाॅकडाऊनची शक्यता! कोरोना रूग्णसंख्येनं ठरलेला ‘तो’ आकडा ओलांडला