एका बातमीमुळं हुकलं होतं शरद पवारांचं पंतप्रधानपद, विलासरावांचा होता मोठा हात

महाराष्ट्रातीलच नव्हे तर देशातील दिग्गज राजकारण्यांमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचं नाव घेतलं जातं. काँग्रेसपासून आपल्या राजकीय कारकीर्दीची सुरुवात करणाऱ्या शरद पवार ( NCP Leader Sharad Pawar ) यांनी नंतर स्वतःचा वेगळा राजकीय पक्ष काढला, मात्र पंतप्रधान ( Prime Minister of India ) होण्याचं त्यांचं स्वप्न अद्याप पूर्ण होऊ शकलेलं नाही. ( Sharad Pawar Dream to become a Prime Minister)

शरद पवार आजही पंतप्रधानपदाच्या रेसमध्ये असल्याचं सांगितलं जातं, त्यांच्या पंतप्रधानपदाच्या चर्चा चवीनं चघळल्या जातात, मात्र या पदानं अजूनतरी त्यांना हुलकावणीच दिली आहे. पंतप्रधान होण्याची एक संधी शरद पवार यांना एकदा नक्की मिळाली होती, मात्र फक्त एका बातमीमुळे शरद पवार यांची ही संधी हुकली होती.

काय आहे नेमका किस्सा जाणून घेऊया-

राजीव गांधी ( Congress Leader Rajiv Gandhi ) यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसचं नेतृत्व कुणाकडे जाणार याची एकच चर्चा दिल्लीच्या राजकीय वर्तुळात रंगली होती. देशभरात देखील यावेळीही चर्चा चांगलीच जोर पकडू लागली होती. काँग्रेसमध्ये अनेक दिग्गज नावं होती जी ही जबाबदारी सांभाळू शकत होती. मात्र आतापर्यंतचा इतिहास पाहता गांधी कुटुंबाकडेच ही जबाबदारी असावी असा काँग्रेसच्या एका गटाचा होरा होता.

काँग्रेसच्या या गटाने राजीव गांधी यांच्या पत्नी सोनिया ( Congress President Sonia Gandhi ) यांनी ही जबाबदारी स्वीकारावी यासाठी प्रयत्न चालवले होते, मात्र सोनिया गांधी यांनी राजकारणात येण्यास स्पष्ट शब्दात नकार दिला. त्यामुळे सोनिया गांधींचा पर्याय वजा झाला होता. आता गांधी कुटुंब वगळता पर्याय शोधावा लागणार होता. जी काही नावं चर्चेत होती, त्यात महाराष्ट्राच्या शरद पवार यांचं नाव देखील चर्चेत होतं.

दिल्लीत राजकीय वातावरण चांगलंच तापलं होतं. रेसमध्ये असलेला प्रत्येक नेता या बड्या पक्षाचं नेतृत्त्व आपल्याकडेच कसं येईल यासाठी प्रयत्न करताना दिसत होता. कोण काँग्रेसचं नेतृत्त्व सांभाळणार याकडे साऱ्या देशाचं लक्ष लागलं होतं.

अशावेळी पत्रकार अॅक्टिव्ह झाले नसते तरच नवल, काही बातमी मिळते का? यासाठी पत्रकार नेत्यांच्या भेटीगाठी घेत होते. त्यांच्याकडून काही लीड मिळतंय का? याची चाचपणी करत होते. अशातच ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई ( Journalist Rajdeep Sardesai ) यांना एक बातमी मिळाली आणि या बातमीनं शरद पवारांचं पंतप्रधानपद हिसकावलं गेलं.

काय होती ही महत्त्वाची बातमी?

त्यावेळी टाईम्स ऑफ इंडियामध्ये काम करणारे पत्रकार राजदीप सरदेसाई महाराष्ट्रातीलच त्या काळचे महत्त्वाचे नेते विलासराव देशमुख ( Congress Leader and Former CM Vilasrao Deshmukh ) यांना भेटण्यासाठी गेले होते. गप्पांच्या ओघात “शरद पवारांनी प्रत्येक खासदाराला २ कोटी रुपये ऑफर केले आहेत”, असं विलासरावांनी सांगून टाकलं आणि इथंच राजदीप सरदेसाईंना ती महत्त्वाची बातमी मिळाली.

पवारांच्या या ऑफरची बातमी राजदीप सरदेसाई यांनी टाईम्स ऑफ इंडिया वर्तमानपत्रात छापून आणली. कुठलीही शहानिशा न करता ही बातमी छापून आली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्या दिवशी टाईम्स ऑफ इंडियाचे तेव्हाचे संपादक दिलीप पाडगावकर यांची सुट्टी होती, नाहीतर कदाचित ही बातमी छापून सुद्धा आली नसती.

सरदेसाईंच्या या बातमीनं दिल्लीच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. या बातमीचा व्हायचा तो परिणाम झाला. पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून शरद पवार यांचं नाव बाहेर फेकलं गेलं. अर्थात शरद पवार पंतप्रधान होता होता राहिले. तेव्हा तसं झालं नसतं तर शरद पवार यांचं पंतप्रधानपदाचं स्वप्न कधीच पूर्ण झालं असतं.

राजदीप सरदेसाई यांनी स्वतः एका मुलाखतीत या गोष्टीचा खुला केला आहे. ते म्हणतात, माझ्या एका बातमीमुळे महाराष्ट्राचं पंतप्रधानपद हुकलं. भाग्य म्हणा किंवा दुर्भाग्य पण ही बातमी छापून आल्यानंतर शरद पवारांचा मला फोन आला. ते मला म्हणाले, राजदीप….  काय केलंस तू? आमचा सगळा प्लॅन प्लॉप केलास तू… तुला माहित आहे का, या एका बातमीमुळे माझी संधी हुकणार आहे?”