उत्कर्ष शिंदेंनी घेतली शरद पवारांची भेट; राष्ट्रवादीत अस्वस्थता!

पुणे : पिंपरी-चिंचवड शहरासह राज्यभरातील राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्यांनी पक्षांतराचा सपाटा लावला आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्यांना आता कलाकार आणि अभिनेत्यांची भुरळ पडली आहे. लोकसभेला अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर त्यांनी गायक व अभिनेता डॉ. उत्कर्ष शिंदे यांना पिंपरी या अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या मतदारसंघातील उमेदवारीसाठी आवतण दिलं असल्याचं बोलल जात आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि डॉ. शिंदे यांची गुरुवारी मुंबईत भेट झाली. या भेटीमुळे राष्ट्रवादीच्या पिंपरी मतदारसंघातील इच्छुकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे.

2009 च्या मतदारसंघाच्या पुनर्रचनेमध्ये पिंपरी हा स्वतंत्र मतदारसंघ अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवण्यात आला. त्यानंतर पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादीचे अण्णा बनसोडे विजयी झाले. त्यामुळे पिंपरी हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जात होता. मात्र, गत पंचवार्षिक निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लाटेत या मतदारसंघात शिवसेनेचे गौतम चाबुकस्वार यांनी बाजी मारली. तसेच, अण्णा बनसोडे यांचा पराभव झाला.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी मतदारसंघातून अण्णा बनसोडे व माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ इच्छुक आहेत. राष्ट्रवादीतील दोन्ही इच्छुकांकडून मलाच पक्षश्रेष्ठींकडून उमेदवारीचे संकेत मिळाल्याचा दावा केला जात आहे.

पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादीतून बनसोडे व ओव्हाळ यांच्यात उमेदवारीवरून चुरस सुरू असताना अचानक डॉ. उत्कर्ष शिंदे यांना उमेदवारीची चर्चा सुरू झाली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये निष्ठावंत कार्यकर्ते व आयात उमेदवार असा नवा संघर्ष सुरू होण्याची शक्यता आहे.

दरम्यान, प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा मुलगा अशीही डॉ. उत्कर्ष शिंदे यांची समाजात ओळख आहे. वडील आणि भाऊ आदर्श शिंदे यांच्या सांस्कृतिक क्षेत्रातील वलयाचा फायदाही उत्कर्ष यांना होण्याची आशा आहे. 

महत्वाच्या बातम्या-