पुणे | नाशिकमध्ये आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर (Girish Kuber) यांच्यावर शाईफेक करण्यात आली. संभाजी ब्रिगेडच्या (Sambhaji Brigade) कार्यकर्त्यांकडून ही शाई फेक करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराजांबद्दल लिहिलेल्या पुस्तकावरून वाद असल्याचं संभाजी ब्रिग्रेडकडून सांगण्यात आलं आहे.
समंलेन परिसरात पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. गिरीश कुबेर यांनी लिहिलेलं ‘Renaissance State’ या पुस्तकावर सध्या महाराष्ट्रात बराच वाद सुरु आहे. आणि याच पुस्तकात संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त लिखाण केल्याचा ठपका ठेवत संभाजी ब्रिगेडने हे कृत्य केलं आहे. यावर संभाजी ब्रिगेडचे प्रविण गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही ना कधी शाहीस्तेशाही ऐकली ना अफजलशाही, मुघलशाही, कुतुबशाही, आदिलशाही, निजामशाही यांच्या नोकरांच्या नावाने कोणतीही शाही निर्माण झाली नाही परंतु रयतेचे स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांच्या शिवशाहीचे नोकर असणाऱ्या पेशव्यांची पेशवाई कशी काय होऊ शकते. स्वतःची वस्त्रे ही सातारा छत्रपतींच्या दरबारात नतमस्तक होऊन ज्यांना घ्यावी लागत होती त्या पेशव्यांची पेशवाई कशी निर्माण होऊ शकते?, असं प्रविण गायकवाड म्हणालेत.
रणांगणातील रक्त पहिल्या पावसात वाहून गेलं परंतु काळ्या शाईने लिहिलेल्या इतिहासाने शिवशाहीची पेशवाई केली. जोपर्यंत छत्रपतींचे वारस गादीवर होते तोपर्यंत मराठे लढत राहिले. अजूनही महाराष्ट्रात छत्रपतींच्या गादीवर छत्रपतीच विराजमान आहेत आणि अजूनही प्रत्येक जण तिथे नतमस्तक होतो. प्रत्येक माणसाच्या मनामध्ये त्यांच्याबद्दलच आस्था आणि प्रेमही आहे. विनाकारण कोणीही छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना बाजीरावासोबत करून पेशवाई नावाचा पायंडा पाडण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्याला जशास तसे उत्तर देण्यात येईल, असं प्रविण गायकवाड यांनी म्हटलंय.
गिरीश कुबेर यांच्या Renaissance of State या पुस्तकाचा सार पाहता लक्षात येते की छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा संघर्षाच्या काळात मस्तानीच्या प्रेमात अडकलेला बाजीराव पेशवा श्रेष्ठ होता आणि याचाच संदर्भ पकडून ते आजच्या राजकारणात शरद पवारांपेक्षा फडणवीसांची श्रेष्ठता मांडताना दिसतात, असं सांगत प्रविण गायकवाड यांनी कुबेरांवर निशाणा साधला आहे.
गिरीश कुबेर आपल्या पुस्तकात देवेंद्र फडणवीस यांना देशाचे भावी पंतप्रधान संबोधतात. छत्रपती शिवरायांची तुलना बाजीरावाशी करून शरद पवार यांची तुलना फडणवीस बरोबर करण्याची क्लुप्ती या पुस्तकातून दिसून येते जी ब्राह्मणी वर्चस्व सिद्ध करण्यासाठीच मांडलेली आहे, अशी टीकाही गायकवाड यांनी गिरीश कुबेरांवर केली आहे.
गिरीश कुबेर हे लोकसत्तासारख्या मराठी वृत्तपत्राचे संपादक असतानाही हे पुस्तक इंग्रजीतूनच का लिहितात कारण जगामध्ये इंग्रजी ही ज्ञानभाषा मानली जाते, इंग्रजी मध्ये लिहिलं गेलेलं पुस्तक हे प्रमाण मानलं जातं. जेम्स लेनने ही Shivaji The Hindu King in Islamic India हे पुस्तक इंग्रजीतूनच लिहिलं होतं. इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद मराठीत करून खोटा इतिहास शिवप्रेमींच्या माथी मारण्याचं हे एक षडयंत्र आहे, असंही प्रविण गायकवाड यांनी म्हटलंय.
महत्त्वाच्या बातम्या-
Omicron चे रुग्ण आढळल्यानंतर पुणे प्रशासन लागलं कामाला; घेतला हा निर्णय
साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक!
मोठी बातमी! Omicron चा धसका; ‘या’ जिल्ह्यात जमावबंदी लागू
Corona ची लागण झालेल्यांनी काळजी घ्या; Omicron बाबत धक्कादायक माहिती समोर
सावधान! ‘या’ वयोगटातील लोकांना Omicron व्हायरसचा सर्वात जास्त धोका