प्रवरा मेडिकल ट्रस्ट 6 दिवसात उभारणार ‘कोविड 19’चे नवीन हॉस्पिटल; मदतीचं आवाहन

अहमदनगर | जगभरात आलेल्या कोरोना १९ या संकटाच्या विरोधात आता ग्रामीण भागही लढाईसाठी सज्ज झाला पाहिजे या हेतूने प्रवरा ग्रामीण रुग्णालय व प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ हे लोणी येथे आधुनिक सुविधांनी युक्त १०० खाटांचे हॉस्पिटल पुढील सहा दिवसात स्थापन करीत आहे, अशी माहिती संस्थेचे प्र कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील यांनी दिली.

प्रवरा ग्रामीण रुग्णालय व प्रवरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस गेली ४५ वर्ष ग्रामीण भागात आरोग्य सेवेत कार्यरत आहे. पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील यांनी ग्रामीण भागातील लोकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून सुरु केलेले हे रुग्णालय नंतरच्या कालखंडात पद्मभूषण डॉ बाळासाहेब विखे पाटील यांनी गरीब माणूस केंद्रबिंदू ठेवून चालवत त्याला आधुनिकतेची जोड दिली. हे रुग्णालय नगर, नाशिक, औरंगाबाद, बीड तसेच इतर जिल्ह्यातील गरीब गरजू रुग्णांसाठी आरोग्य सेवेचे कार्य करते. देशात ग्रामीण भागात सेवा देणारी तंत्रज्ञानाने परिपूर्ण असे एकमेव रुग्णालय म्हणून प्रवरा ग्रामीण रुग्णालया ची ओळख आहे. सामाजिक बांधिलकीतून आपण हे कोविड १९ हॉस्पिटल चा उपक्रम राबवित आहोत, ही माहिती डॉ राजेंद्र विखे पाटील यांनी दिली. यावेळी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ वाय एम जयराज हे उपस्थित होते.

संस्था नव्याने तयार करत असलेल्या या कोरोना १९ रुग्णालयात जनरल वॉर्ड, आय. सी. यू, लहान मुलांकरिता स्वतंत्र वॉर्ड तयार करत आहे. रुग्णालयात आवश्यक ऑक्सीजन लाईन, एअर कंडिशनिंग, तसेच सक्शन ची सुविधाही संस्था तयार करत आहे. उत्तर नगर जिल्ह्यात कोरोना १९ च्या विरोधात आरोग्य सुविधा देण्यासाठी पुढील सहा दिवसात हे रुग्णालय उभे राहील पण यासाठी लागणारे तंत्रज्ञान व आयसीयू इतर उपकरणे नवीन लॅब, लॅबरोटरी यासाठी अंदाजे नऊ कोटी रुपये खर्च येईल. या कामात प्रवरा ग्रामीण रुग्णालयाला डॉक्टरसह पाचशे लोकांचा स्टाफ लागेल.

या हॉस्पिटल करिताचा बराच खर्च प्रवरा मेडिकल ट्रस्ट व प्रवरा अभिमत विद्यापीठ उचलनार आहे, पण या कार्यात राज्यातील दानशूर व्यक्ती, उद्योजक, संस्था यांनी पुढे येऊन आर्थिक किंवा वस्तू स्वरूपात तंत्रज्ञान, मेडिसिन, संसर्गजन्य आजारापासून बचावासाठी लागणारे मास्क, सूट, इतर गोष्टी उपलब्ध करून देण्यात मदत केली तर आपल्या सहयोगातून देशावर आलेल्या संकटात काही खारीचा वाटा आपण उचलण्यासाठी मदत होईल असे आवाहन डॉ राजेंद्र विखे-पाटील यांनी केले.

आपली मदत प्रवरा मेडिकल ट्रस्ट, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा पी एम टी लोणी, खाते क्रमांक 1680932463, IFSC code – CBIN0283278 या नावे पाठवावी.
अधिक माहितीसाठी नकुल तांबे मो. 9767294342 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले.

महत्वाच्या बातम्या –

-क्रिकेटप्रेमींना भारत- पाकिस्तान सामन्यांमधला थरार पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार!

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी 70 हजार स्थलांतरित कामगारांविषयी घेतला मोठा निर्णय

-जगातील पहिल्या कोरोनाबाधित महिलेचा चीन सरकारवर निशाणा, म्हणाली…

-कोरोनावर मात करण्यासाठी ‘रयत शिक्षण संस्था’ही सरसावली; दिली 2 कोटी रूपयांची मदत

-मराठमोळा क्रिकेटपटू अजिंक्य रहाणेनेही कोरोनाग्रस्तांसाठी केली मोठी मदत