रुग्णांना खाटा उपलब्ध होण्याच्या तक्रारी, खासगी रुग्णालयांना आरोग्यमंत्र्यांच्या अचानक भेटी

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा राज्य शासनाने ताब्यात घेतल्या आहेत. मात्र अद्यापही काही ठिकाणी रुग्णांना खासगी रुग्णालयांकडून अपेक्षित ते सहकार्य होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्याची दखल घेऊन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल रात्री मुंबईतील खासगी रुग्णालयांना अचानक भेटी दिल्या. मंगळवारी पहाटे दोन वाजेपर्यंत आरोग्यमंत्री रुग्णालयातील खाटांच्या उपलब्धतेबाबत माहिती घेत होते.

रुग्णांना दिलेल्या खाटांची अचूक माहिती रुग्णालय प्रशासनाने जाहीर फलकावर द्यावी. राज्य शासनाच्या नियमांचे पालन केलेच पाहिजे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. दरम्यान, या भेटीमध्ये चारही रुग्णालयांमध्ये काही बाबींची अपूर्णता आढळून आल्याने राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे यांनी या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

कोरोना तसेच कोरोनाशिवाय अन्य आजारांच्या रुग्णांचा उपचाराअभावी मृत्यू होऊ नये यासाठी राज्य शासनाने मुंबईसह राज्यातील खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा ताब्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातूनही रुग्णांना मोफत उपचाराचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रने घेतलेला हा अभिनव निर्णय अन्य राज्यांनाही प्रेरणादायी ठरला आहे.

८० टक्के खाटा राखीव करूनही रुग्णांना खाटा नाकारण्याचे किंवा बेड फुल झाल्याचे कारण खासगी रुग्णालयांकडून दिले जाते. यासंदर्भात रुग्णांच्या तक्रारी येत असून त्याची दखल घेत काल रात्री दहाच्या सुमारास आरोग्यमंत्र्यांनी खासगी रुग्णालयांना भेट देण्याचे मिशन हाती घेतले. त्यांच्यासोबत राज्य आरोग्य सेवा हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुधाकर शिंदे होते.

महत्वाच्या बातम्या-

-सर्वात कमी लोकप्रियता असणाऱ्या मुख्यमंत्र्यांपैकी तीन मुख्यमंत्री हे भाजपाशासित राज्यांमधले!

-हिंदुस्थान युनिलिव्हरकडून सरकारला मोठी मदत; उद्धव म्हणाले, तुमची मदत कधीच विसरणार नाही!

-निसर्ग चक्रीवादळाचं संकट टळलं, महाराष्ट्रावर विठू-माऊली आणि मुंबादेवीची कृपा- मुख्यमंत्री

-राज्यात आज 2560 नव्या कोरोनाबाधितांची नोंद; पाहा तुमच्या भागात किती?

-लडाखमध्ये तुमचा हस्तक्षेप नको, आमचं आम्ही बघू; चीनचं अमेरिकला उत्तर