सरकारने दिलेल्या कर्जमाफीचा पुनर्विचार करावा- राजू शेट्टी

कोल्हापूर | उद्धव ठाकरे सरकारने शेतकऱ्यांसाठी पीक कर्जमाफीचा घेतलेला निर्णय हा घाईगडबडीत घेतलेला निर्णय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही. म्हणून सरकारने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिलेलं आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही, असा आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांनी खरीप पिकांवर काढलेलं कर्ज फेडणं शक्य नाही, असंही राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

सध्याच्या कर्जमाफीच्या आदेशानुसार हा शेतकरी थकबाकीदार ठरत नाही तसेच तो हे कर्ज बँकांना परतही करु शकत नाही कारण त्याच्या पिकांचे आतोनात नुकसान झालं आहे. नव्या कर्जमाफी योजनेनुसार मागील वर्षी जो शेतकरी थकबाकीदार ठरला तोच या योनजेसाठी पात्र ठरला आहे. तर यंदा ज्यांनी कर्ज काढलं ते पात्र ठरत नाहीत. त्यामुळे या कर्जमाफीत त्रुटी आहेत, असं राजू शेट्टी यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अर्थमंत्री जयंत पाटील यांनी 21 हजार कोटींची कर्जमाफी होत असल्याचे सांगितलं आहे. मात्र हे शक्यच नाही. कारण या कर्जमाफीतील अटींमुळे याचा सर्व प्रकारच्या शेतकऱ्यांना फायदा मिळणार नाही. त्यामुळे ही कर्जमाफी 6 ते 7 हजार कोटींच्या पुढे जाणार नाही, असंही राजू शेट्टी यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-