मराठवाड्यात राष्ट्रवादीला धक्का; आमदार राणा जगजीतसिंह पाटील वडिलांसह भाजपच्या वाटेवर!

उस्मानाबाद :  राष्ट्रवादीच्या आमदारांना एकापाठोपाठ एक युती प्रवेशाचे वेध लागल्याचं दिसत आहे.  उस्मानाबादचे विद्यमान आमदार राणा जगजीतसिंह पाटील आणि माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील भाजपचा झेंडा हाती घेणार असल्याचं कळतंय. ‘मला तुमच्याशी काही बोलायचंय’ अशा आशयाचे फलक लावून जगजीतसिंह पाटलांनी राष्ट्रवादीला रामराम ठोकण्याची तयारी केलेली दिसत आहे.

शरद पवार यांचे विश्वासू आणि निष्ठावंत सहकारी मानल्या जाणाऱ्या पाटील यांनी पक्ष सोडल्यास मराठवाड्यात राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जाईल.

खुला संवाद साधण्यासाठी जगजीतसिंह पाटील यांनी 31 ऑगस्ट रोजी कार्यकर्त्यांना साद घातली आहे. ‘दादा… नवी दिशा, नवी आशा… मला तुमच्याशी काही बोलायचंय!! परिवार संवाद, आवर्जून उपस्थित राहा’ असे फलक लावण्यात आले आहेत.

पक्ष सोडण्यापूर्वी कार्यकर्त्यांची मतं जाणून घेण्यासाठी आणि शक्तीप्रदर्शन करण्यासाठी त्यांनी कार्यकर्त्यांना बोलावलं आहे. यावेळी ते भाजप प्रवेशाची घोषणा करणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Rana Jagjitsinh 1