“मोदीजी आता तरी हट्ट सोडा आणि तीन…”

नवी दिल्ली | गेल्या काही दिवासांपासून देशातील 3 लोकसभेच्या पोटनिवडणुका आणि 29 विधानसभेच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी पहायला मिळाली. त्यानंतर आज अखेर या सर्व जागांचे निकाल लागले. या निकालानंतर भाजपला मोठा धक्का बसल्याचं पहायला मिळालं आहे.

भाजपला लोकसभा तसेच विधानसभेच्या जागेवर काही खास कामगिरी करता आली नाही. त्यावरून आता काँग्रेसने भाजपवर निशाणा साधला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंग सुरजेवाला यांनी काँग्रेस नेत्यांचं कौतुक करत भाजपवर टीका केली आहे.

आज लागलेल्या पोटनिवडणूकीचे निकाल हे काँग्रेससाठी सकारात्मक असल्याचं सुरजेवाला यांनी म्हटलं आहे. आजचा हा निकास देशाचा कौल म्हणून पाहिला जात असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हट्ट सोडावा, असं रणदीप सुरजेवाला यांनी म्हटलं आहे.

सुरजेवाला यांनी ट्विट करत भाजपला टोले लगावले आहेत. लोकसभेच्या पोटनिवडणुकीत भाजपने 3 पैकी 2 जागा गमावल्या आहेत. काँग्रेस-भाजपमध्ये थेट लढत असलेल्या विधानसभा निवडणुकीतही भाजपाचा पराभव झाला असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय.

हिमाचल, राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र हाच भाजपच्या पराभवाचा पुरावा आहे, असंही सुरजेवाला म्हणाले. मोदीजी आता तरी हट्ट सोडा आणि तीन काळे कायदे मागे घ्या, असा सल्ला सुरजेवाला यांनी नरेंद्र मोदींना दिला आहे.

पेट्रोल-डिझेल त्याचबरोबर गॅसची लूट थांबवा आणि अहंकार सोडा, असंही सुरजेवाला म्हणाले आहेत. देवभूमी हिमाचलच्या जनतेने या लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीत काँग्रेसवर विश्वास व्यक्त करत ऐतिहासिक इतिहास लिहिला असल्याचं देखील त्यांनी यावेळी म्हटलं आहे.

भाजपच्या जाण्यानं आणि काँग्रेसच्या येण्याने आता नवीन हिमाचलची निर्मिती निश्चित आहे, असंही सुरजेवाला म्हणाले आहेत. हिमाचल प्रदेशातील मंडी येथे काँग्रेसने निवडणुकीची जोरदार तयारी केली होती. त्यानंतर काँग्रेसला यश मिळालं आहे.

दादरा नगर हवेली, हिमाचल प्रदेशातील मंडी आणि मध्य प्रदेशमधील खांडवा या तीन जागांवर लोकसभेची पोटनिवडणूक पार पडली होती. त्यातील तीन पैकी दोन जागा भाजपला गमवाव्या लागल्या. त्यानंतर रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत भाजपवर टीका केली आहे.

लोकसभेच्या तसेच विधानसभेच्या बहुतांश जागेवर काँग्रेस विरूद्ध भाजप अशीच लढत पहायला मिळाली होती. विधानसभेच्या अनेक जागांवर भाजपला आज पराभव स्विकारावा लागला आहे.

दरम्यान, दादरा नगर हवेली लोकसभेच्या पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार कलाबेन डेलकर तब्बल 51 हजार मतांनी विजयी झाल्या आहेत. त्याचबरोबर शिवसेनेने भाजपला मोठा धक्का देत दादरा नगर हवेलीच्या लोकसभेची जागा आपल्या नावावर केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“महिलेचा अपमान करणारी प्रवृत्ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातीतली असूच शकत नाही” 

भाऊबीजेला भेट म्हणून सुप्रिया सुळे अजित पवारांकडे सिलेंडर मागणार

अनिल देशमुख यांना 6 नोव्हेंबरपर्यंत कोठडी, दिवाळीही निघणार तुरुंगात

 “अनिल देशमुख यांना फसवलं गेलंय”

  शरद पवारांनी विकासाचा सूर्य दाखवला- उद्धव ठाकरे