देशाच्या माजी राष्ट्रपतींचा मुलगा वंचित बहुजन आघाडीकडून निवडणूक लढवणार??

मुंबई | विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. विधानसभा 3 महिन्यांवर येऊन ठेपली आहे. संभाव्य उमेदवार मंडळी आपल्याला कोणता पक्ष तिकीट देईल याची चाचपणी करत आहेत. अशीच चाचपणी देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत यांनी केली असल्याचं समजतंय.

रावसाहेब शेखावत यांनी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतली आहे. शेखावत वंचितकडून अमरावतीतून विधानसभा लढवू शकतात, असा अंदाज राजकीय वर्तुळात लावला जात आहे.

एकूणच विदर्भात प्रकाश आंबेडकरांच्या भारिपचं राजकीयदृष्या चांगल वजन आहे. त्याबरोबर लोकसभेचा अनुभव त्यांच्या गाठीशी तर आहे. म्हणून अनेक उमेदवार त्यांच्याकडे आकर्षित होत आहेत.

लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांना मिळालेली मत पाहता बऱ्याच संभाव्य उमेदवारांचा कल वंचितकडे आहे. त्याला शेखावतसुद्धा अपवाद नसल्याचं बोललं जात आहे.

शेखावत अमरावती विधानसभा मतदारसंघातून 2009 मध्ये काँग्रेसच्या तिकीटावर आमदार झाले. मात्र 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना 36 हजार मतांनी पराभव पहावा लागला.

दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी या भेटीवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र आंबेडकर-शेखावत भेटीने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.