ठाकरे सरकारच्या शपथविधीवर नेमका किती कोटींचा खर्च??; अधिकारी माहिती लपवतायेत?

मुंबई |  महाराष्ट्रातील ठाकरे सरकारच्या शपथविधीवर किती खर्च करण्यात आला आहे? याची अचूक माहिती देण्यात महाराष्ट्र शासन अपयशी ठरलंय. याबाबतीत सादर करण्यात आलेल्या माहिती अधिकार अर्जाच्या वेगवेगळया माहितीत तफावत आढळून आली आहे.

महाराष्ट्रात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली बनलेल्या महाविकास आघाडी सरकारच्या मंत्र्यांसाठी शिवाजी पार्क येथे शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला. या शपथविधीसाठी एकूण किती खर्च झाला? या उत्सुकतेपायी नेहमीप्रमाणे असंख्य अर्ज सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार विभागाकडे दाखल झाले पण दुर्दैवाने कोणासही अचूक माहिती आणि आकडेवारी देण्यात आली नाही

.अनिल गलगली यांना पाठविलेल्या माहितीत कक्ष अधिकारी रा. रो. गायकवाड यांनी एकूण खर्च 2 कोटी 79 लाख झाल्याचे कळवले आहे तर प्रथम अपील सुनावणीनंतर अजय बोस यांस एकूण खर्च 4 कोटी 63 लाख झाल्याची माहिती कळविली आहे. या आकडेवारीत मोठी तफावत आहे. संपूर्ण माहिती नसतानाही अर्धवट माहिती देण्यात जन माहिती अधिकारी यांस काय स्वारस्य आहे? याबाबत मंत्रालयात चर्चा सुरु आहे.

अनिलगलगली यांच्या मते शपथविधीवर झालेला खर्च हा जनतेच्या तिजोरीतुन झालेला असून या बाबत अचूक आणि खरी आकडेवारी महाराष्ट्र शासनाने माहिती अधिकार कायदा अधिनियम 2005 चे कलम 4 अंतर्गत संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात यावी. तसंच माहिती मधील तफावत लक्षात घेता कुणी जाणूनबुजून माहिती तसंच खर्चाची आकडेवारी लपवण्याचा प्रयत्न तर नाही याची चौकशी करत कार्यवाही करावी, अशी मागणी गलगली यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-डोनाल्ड ट्रम्प यांच्या गुजरात दौऱ्यावर मनसेचा आक्षेप

-मोदी सरकारचा दिल्लीकरांना दणका; निकालानंतर गॅस 144 रूपयांनी वाढला!

-दिल्लीत शिवसेनेच्या सर्वच्या सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त!

-“अरे कशाला करताय बंगल्यांची दुरूस्ती… डागडुजी होण्याअगोदरच तुमचं सरकार पडणार”

-भाजप ही राष्ट्रीय आपत्ती म्हणणाऱ्या पवारांना ट्वीट करून भाजपचा खडा सवाल!