“मिलिंद देवरांना मुंबई काँग्रेस अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय योग्यच”

मुंबई : मिलिंद देवरा यांना मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन हटवण्याचा निर्णय अतिशय योग्य होता, ते जबाबदारी पार पडण्यात अपयशी ठरले, असा टोला मुंबई काँग्रसचेे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी लगावला आहे. निरुपम यांच्या ट्वीटमुळे मुंबई काँग्रेसमधील दुफळी चव्हाट्यावर आली आहे. माजी खासदार एकनाथ गायकवाड यांच्याकडे मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदाची धुरा सोपावण्यात आली आहे.

मुंबईतील लोकसभा पराभवाची जबाबदारी स्विकारत मिलिंद देवरा यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. राहुल गांधी यांनी राष्ट्रीय अध्यक्षपद, तर अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. देवरा यांनी लोकसभेच्या पराभवाची नैतिक जबाबदारी स्विकारत त्यांनी राजीनामा दिला होता.

काँग्रेसला मुंबईतील 6 लोकसभा मतदारसंघांपैकी एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. मिलिंद देवरा, संजय निरुपम, एकनाथ गायकवाड, प्रिया दत्त आणि उर्मिला मातोंडकर या दिग्गजांना पराभवाची धूळ चाखावी लागली होती.

2014 मध्ये दक्षिण मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. त्याआधी मिलिंद देवरा यांनी दक्षिण मुंबईतून खासदारकी मिळवली होती. यंदाही काँग्रेसकडून मिलिंद देवरा दक्षिण मुंबईतून रिंगणात उतरले. मात्र यंदाच्या निवडणुकीत पुन्हा सावंत यांच्याकडून देवरांचा दारुण पराभव झाला आहे. 

महत्वाच्या बातम्या –