…तर चिनी वटवाघळांच्या प्रेमात पडायचं कशाला?; सामनाच्या अग्रलेखातून सवाल

मुंबई | काँग्रेस आणि समाजवादी पार्टीबरोबरच शिवसेनेनेही आता रॅपीड टेस्ट कीटवरून भाजपसमोर सवाल उपस्थित केला आहे. आज सामनाच्या अग्रलेखातून रॅपीड टेस्ट कीटवरून मोदी सरकारवर शिवसेनेने टीका केली आहे.

मोदी सरकारने जी रॅपिड टेस्टिंग किट्सची ऑर्डर चीनला दिली, त्या किट्सची पहिली खेप बिनकामाची निघाली. शेवटी चिनी माल भंगारात गेल्यावर केंद्राला राज्यांना सूचना द्याव्या लागल्या की, `झाले ते झाले. सध्याच्या बोगस कीट्सऐवजी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने बनवलेले कीट्स वापरा!’ म्हणजे मेक इन आणि मेड इन इंडियाचा स्वदेशी माल असताना आपण चिनी वटवाघळांशी व्यापार करू लागलो. चिनी वटवाघळांच्या प्रेमात पडायचे कशाला आणि त्यांना लटकायचे कशाला?, अशा शब्दात रॅपीड टेस्टवरून शिवसेनेने निशाणा साधला आहे.

चीन कधी काय करेल याचा भरवसा नाही व इतके असूनही भारतासारखे राष्ट्र चीनकडून कोरोना या विषाणूच्या रॅपिड टेस्ट कीट मोठय़ा प्रमाणात घेत आहे व एकप्रकारे चीनच्या अर्थव्यवस्थेस मजबुती देणारे काम करीत आहे. एक वेळ तेही चालले असते, पण चिनी मालाची अवस्था ही `चले तो चांद तक, नहीं तो रात तक’ अशीच असते. त्यामुळेच चीनकडून खरेदी केलेले लाखो रॅपिड टेस्ट कीट भंगारात टाकून देण्याची वेळ आपल्यावर आली आहे, अशी टीका शिवसेनेने केली आहे.

धारावीसारख्या `कोरोना हॉट स्पॉट’ भागात रॅपिड टेस्टचे काम सुरू झाले, पण मुंबई महापालिका प्रशासनाने या रॅपिड टेस्ट तत्काळ थांबवायला सांगितल्या. कारण चिनी माल नेहमीप्रमाणे भंगार निघाला व कोरोनाचा बाजार करून चीनने भारताच्या गळय़ात टाकावू माल मारला. फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरातून रॅपिड टेस्ट कीटबाबत तक्रारी येऊ लागल्या. हा सर्व गोंधळ कोरोनाबाबतची चिंता वाढवणारा असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-“हे संकट देशावरचं सगळ्यात मोठं संकट आहे, या संकटात राजकारण करणं गैर”

-‘या’ दोन्ही लढाईतही आपणच जिंकू – नितीन गडकरी

-फेसबुकसोबत करार होताच जिओनं केला हा कारनामा!

-राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांविषयी अश्लील कमेंट्स; पुण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल

-‘…तर मी आत्महत्या करेन’; नसीरूद्दीन शाह यांचं धक्कादायक वक्तव्य