“कायदे करताना त्यावर चर्चा करत नसाल तर ही लोकशाही नसून हुकुमशाही”

पुणे | देशाच्या स्वातंत्र्यानंतर रस्त्यावर सर्वाधिक काळ चाललेलं आंदोलन म्हणून तीन कृषी कायद्याविरोधातील शेतकरी आंदोलन ओळखण्यात येतं. हे कायदे आता मागं घेतले असले तरी आपल्या काळ्याकुट्ट पाऊलखुणा या आंदोलनानं मागं ठेवल्या आहेत.

शेतकरी आंदोलनात शेतकरी आणि सरकारच्या संघर्षात 700 हून अधिक शेतकऱ्यांना आपला जीव गमवाला लागला. शेतकरी काही केल्या मागं हटायला तयार नाहीत हे लक्षात आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे कायदे मागं घेण्याची घोषणा केली.

प्रचंड बहूमताच्या जोरावर केंद्रामध्ये सलग दोनवेळा सत्तेत आलेल्या मोदी सरकारनं आपल्या बहुमताचा वापर हुकुमशाहीसारखा केल्याची टीका मोदी सरकारवर विरोधक करत आहेत.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नरेंद्र मोदी सरकारवर कृषी कायद्याच्या विषयावरून जोरदार टीका केली आहे. परिणामी पुन्हा शेतकरी आंदोलनाचा मुद्दा चर्चेत आला आहे.

केंद्र सरकारनं कुणाशी कसलीही चर्चा न करता कायदे केले होते. ते आता मागं घेतले आहेत. मात्र कायदे करताना त्यावर चर्चा करत नसाल तर ही लोकशाही नसून हुकुमशाही आहे, अशी टीका पवार यांनी केली आहे.

देशातील शेतकरी या घटकाला केंद्र सरकारनं प्राधान्य द्यायला पाहिजे. पण दुर्देव सरकार शेतीकडं म्हणावं असं लक्ष देताना दिसत नाही, अशी खंतही पवार यांनी शेतकरी आणि शेती या विषयावर बोलताना व्यक्त केली आहे.

केंद्र सरकारनं जेव्हा हे तीन कृषी कायदे केले तेव्हाच जर शेतकऱ्यांशी चर्चा केली असती तर अशी वेळच आली नसती. कसलीही चर्चा न करता मोदी सरकारनं हे कायदे पारित केले होते. परिणामी सरकारला शेतकऱ्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं, असंही पवार म्हणाले आहेत.

तीन कृषी कायद्यांमध्ये काही गोष्टी या व्यवस्थित होत्या पण काही गोष्टी या अडचणी निर्माण करणाऱ्या होत्या. या अडचणी सुटल्या असत्या तर केंद्र सरकारनं योग्य वेळी चर्चा केली असती, असं पवार म्हणाले आहेत.

शरद पवार यांनी राजगुरूनगर येथे शेतकरी मेळाव्याला संबोधित केलं आहे. पवार यांनी आपल्या भाषणादरम्यान मोदी सरकारवर टीका करतानाच शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी काही महत्त्वाच्या बाबींवर भाष्य केलं आहे.

दरम्यान, केंद्र सरकारनं शेतकऱ्यांना स्वस्त दरात कर्ज योजना उपलब्ध करून देण्याची गरज शरद पवार यांनी यावेळी व्यक्त केली आहे. शरद पवार हे भारताचे माजी केंद्रीय कृषीमंत्री म्हणून शेतीविषयक केंद्राच्या धोरणाला अधिक जवळून ओळखतात.

महत्वाच्या बातम्या- 

‘या’ मल्टीबॅगर स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं करोडपती! 

“…त्यात आमचा कार्यकर्ता असेल तर त्यालाही फासावर लटकवून टाका” 

‘ही प्रजाती फक्त भंगारात आढळते’; मलिकांच्या ट्विटला नितेश राणेंचं प्रत्युत्तर 

अत्तरवाल्याकडे सापडलं ‘इतक्या’ कोटींचं घबाड; नोटा पाहून अधिकारीही चक्रावले, मागवावा लागला कंटेनर 

भारतातील Omicron बाधितांचा धक्कादायक रिपोर्ट समोर, ‘कोरोना लस घेतलेल्यांनाच…’