हिंदुंची बदनामी केल्याचा आरोप; ‘नेटफ्लिक्‍स’विरोधात शिवसेनेने केली तक्रार

मुंबई : भारत देश आणि हिंदुंची बदनामी करण्याचा आरोप करत नेटफ्लिक्‍स विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिवसेनेचे आयटी सेलचे सदस्य रमेश सोलंकी यांनी नेटफ्लिक्सविरोधात FIR दाखल केली आहे. मुंबईतील एलटी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये नेटफ्लिक्स विरोधात तक्रार दाखल केली गेली आहे.

तक्रारीमध्ये ‘सेक्रेड गेम्स’, ‘लैला’ आणि ‘घोल’ वेब सीरिजसह स्टँडअप कॉमेडियन हसन मिन्हाजच्या कार्यक्रमाचा उल्लेख करत सोलंकी यांनी नेटफ्लिक्‍सवर जगभरात हिंदुंचा अपप्रचार होत असल्याचा आरोप केला आहे.

नेटफ्लिक्स इंडियावर प्रसिद्ध होणाऱ्या जवळपास सर्व वेब सीरिजद्वारे जागतिक स्तरावर देशाच्या बदनामीचा हेतू दिसून येतोय. हिंदुंबाबत मनात असलेल्या भीतीपोटी नेटफ्लिक्सवर देशाची छबी वाईट पद्धतीनं दाखवली जात आहे, असा आरोप सोलंकी केला आहे. सोबतच सोलंकी यांनी हिंदुंच्या भावना दुखावल्याचा आरोप करत नेटफ्लिक्सविरोधात कठोरातील कठोर कारवाई करण्याचीही मागणी केली आहे. 

मी अधिकाऱ्यांनी विनंती करतो की तक्रारीत नमूद केलेल्या सर्व वेबसीरिज पाहाव्यात आणि नेटफ्लिक्सच्या टीमला समन्स पाठवून लायसन्स रद्द करेपर्यंत जे काही कठोरातील पाऊल उचलावे लागेल ते उचलावेत, अशीही आक्रमक मागणी त्यांनी केली आहे.

नेटफ्लिक्‍स ही एक अमेरिकन कंपनी आहे. गेल्या काही वर्षांमध्ये नेटफ्लिक्स भारतातील मनोरंजन क्षेत्रात प्रचंड लोकप्रिय झालं आहे. काही वेबसीरिजमुळेच नेटफ्लिक्‍स चाहत्यांमध्ये प्रसिद्ध झालं आहे. पण यावरील काही सीरिज वादग्रस्तदेखील ठरल्या आहेत. 

महत्वाच्या बातम्या-