शिवसैनिकांनी मग फक्त झेंडेच उचलायचे का?; आढळरावांचा भाजपला सवाल

पुणे : विधानसभा जागावाटपात भाजप पुण्यात 8 जागा मागत आहे. अशा परिस्थितीत शिवसैनिकांनी मग फक्त झेंडेच उचलायचे का? असा सवाल शिवसेनेचे नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी भाजपला केला आहे. त्यामुळे जागावाटपावरुन शिवसेना-भाजपमध्ये वाद होणार असल्याचं दिसत आहे.

पुण्यातील विधानसभा जागांवरुन भाजप-शिवसेनेत वाद होण्याची चिन्हे आहेत. भोसरी विधानसभा मतदारसंघ मुळचा शिवसेनेकडे आहे, असं आढळरावांनी सांगितलं आहे.

भोसरी मतदारसंघातून यापूर्वीही शिवसेनेचाच खासदार आणि आमदार निवडून आला आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीत युती झाल्यास भोसरी मतदारसंघावर शिवसेनेचाच दावा असेल, असं आढळराव पाटील म्हणाले आहेत.

भोसरीतून शिवसेनेकडून सुलभा उबाळे यांनी तलवार उपसली आहे. तर दुसरीकडे लांडगे यांनी आधीपासूनच भोसरीत ठिकठिकाणी कमळाच्या चिन्हासह फ्लेक्सबाजी करत प्रचाराला सुरुवात केल्याचं दिसत आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप-शिवसेना युती झाली आहे. मात्र वारंवार भाजप-शिवसेनेत जागावाटपावरून वाद होताना दिसत आहेत.