ICC कसोटी क्रमवारी जाहीर; स्मिथचा कोहलीला दे धक्का??

मुंबई: श्रीलंकेने न्यूझीलंडविरूद्ध मिळावलेला कसोटी विजय आणि इंग्लंड संघातील दुसरा कसोटी सामना अनिर्णित राहिला. या सामन्यांनंतर आयसीसीने सोमवारी कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज स्टिव्ह स्मिथ दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. त्याने न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियम्सनला मागे टाकले आहे. स्मिथ आता अव्वल क्रमांकावर असणाऱ्या विराट कोहलीपेक्षा थोड्याच गुणांनी मागे आहे. त्यामुळे विराट कोहलीचे स्थान धोक्यात आले आहे.

स्मिथने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात 92 धावांची खेळी केली होती. तसेच त्याने पहिल्या अ‌ॅशेस सामन्यात दोन शतकी खेळी केल्या होत्या. त्यामुळे त्याने फलंदाजी क्रमवारीत मोठी झेप घेतली आहे.

तसेच फलंदाजी क्रमवारीत मार्नस लॅब्यूशाने 82 वे आणि ट्रेविस हेडने 18 वे स्थान मिळवले आहे. तर इंग्लंडचा अष्टपैलू क्रिकेटपटू बेन स्टोक्सने या सामन्यातील दुसऱ्या डावात केलेल्या 115 धावांच्या शतकी खेळीमुळे 6 स्थानांची झेप घेत 26 वे स्थान मिळवले आहे. त्याचबरोबर यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेअस्टोने 7 स्थानांची प्रगती केली असून तो 30 व्या क्रमांकावर आला आहे.

त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज पॅट कमिन्स गोलंदाजी क्रमवारीत अव्वल क्रमांकावर कायम आहे. त्याने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात 6 विकेट्स घेतल्या होत्या.

या सामन्यातून इंग्लंडकडून कसोटी पदार्पण केलेल्या जोफ्रा आर्चरचा कसोटी क्रमवारीत समावेश झाला असून तो आता गोलंदाजी क्रमवारीत 83 व्या क्रमांकावर आहे. तसेच जॅक लीचने 8 स्थानांची प्रगती केली असून त्याने 40 वे स्थान मिळवले आहे.

श्रीलंकेचा कर्णधार दिमुथ करुणारत्नेनं न्यूझीलंड विरुद्ध केलेल्या 122 धावांच्या शतकी खेळीमुळं फलंदाजी क्रमवारीत पहिल्या दहा खेळाडूंमध्ये स्थान मिळवलं आहे. तो आता 8 व्या क्रमांकावर आला आहे. तसेच या सामन्यात 6 विकेट्स घेणारा श्रीलंकेचा गोलंदाज अकिला धनंजयाने गोलंदाजी क्रमवारीत 9 स्थानांची प्रगती करत 36 वे स्थान मिळवले आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देणाऱ्या ‘त्या’ पोस्टरवरुन भाजपविरोधात संताप

-शोएब अख्तरचे स्मिथबाबत ट्वीट; त्यावर युवराज म्हणतो…

-‘चांद्रयान-2’चा चंद्राच्या कक्षेत यशस्वी प्रवेश

स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भीकेची गरज नाही; संभाजीराजेंचा विनोद तावडेंवर निशाणा

-“महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादी मुक्त करण्याची भाषा करणारं भाजप स्वतःच राष्ट्रवादी’युक्त’ झालंय”