‘या’ तरुणीनं केवळ 300 रुपयांसह सोडलं होतं घर, आज आहे 7.5 करोडच्या कंपनीची मालकीन

मुंबई | प्रत्येकालाच आयुष्यात कोणत्या न कोणत्या गोष्टीसाठी संघर्ष करावा लागतो. काहींना दोन वेळचं पोट भरण्यासाठी संघर्ष करावा लागतो तर काहींना नवा इतिहास रचण्यासाठी संघर्ष करावा लागतो. मात्र, काही लोक असेही असतात ज्यांचं एक वेळचं पोट भरण मुश्किल असताना देखील ते एक नवीन इतिहास रचतात. आज आपण अशाच एका यशस्वी तरुणीची संघर्ष कथा जाणून घेऊयात.

या तरुणीचं नाव आहे चिनू कला. चिनू कला केवळ 15 वर्षांची असताना घरातील टेंशनमुळे तिने आपलं घर सोडलं होतं. चिनूने घर सोडल्यानंतर तिच्याकडे राहण्यासाठी जागा देखील नव्हती. आपल्याला कुठे जायचंय? काय करायचंय? याबद्दल तिला काहीही माहीत नव्हतं. यावेळी चिनू फक्त अंगावरील कपड्यांबरोबर खिशात केवळ 300 रुपये घेऊन घरातून बाहेर निघाली होती.

घरातून निघाल्यानंतर चिनूने राहण्यासाठी एक ठिकाण शोधलं. या ठिकाणी तिला एका रात्रीचे 20 रुपये भाडे द्याव लागत होतं. काही दिवस शोधल्यानंतर चिनूला घरोघर जाऊन चाकू सेट विकण्याची एक नोकरी मिळाली. सेल्सगर्लच्या या कामातून तिला 20 ते 60 रुपये दर दिवशी मिळत होते.

सेल्सगर्लचं काम करत असताना चिनूला अनेक कडू गोड अनुभव आले. बऱ्याचवेळा तर लोक चिनूच्या तोंडावर दरवाजा देखील आदळत. मात्र, तिने यामुळे केव्हा तिचं धैर्य खचू दिलं नाही. याउलट या गोष्टींमुळे चिनू आणखी मजबूत बनत गेली.

काही वर्षे सेल्सगर्लचं काम केल्यानंतर चिनूने ते काम सोडलं आणि ती एका रेस्टॉरंट मध्ये वेटर म्हणून काम करू लागली. या रेस्टॉरंट मध्ये चिनूला पाहिल्यापेक्षा अधिक पैसे मिळू लागले. याकाळात चिनूने स्वतःला आर्थिकदृष्टया स्थिर बनवले.

2004 मध्ये चिनूच्या जगण्याला एक वेगळं वळण मिळालं. तिने अमित कला नावाच्या एका व्यक्तीशी लग्न केलं. हा व्यक्ती पुढे तिचा खूप मोठा आधार बनला. लग्न झाल्यानंतर ती बँगलोरला शिफ्ट झाली.

लग्नाच्या दोन वर्षांनंतर आपल्या मित्रांच्या सांगण्यावरून चिनूने Gladrags मिसेस इंडिया पेजेंटमध्ये भाग घेतला. या स्पर्धेतील इतर स्पर्धक तिच्यापेक्षा खूप जास्त शिकलेले होते. मात्र, तरीही चिनू डगमगली नाही. ती खूप संयमाने आणि बुद्धीने ही स्पर्धा खेळत राहीली. या स्पर्धेत चिनू फायनल स्पर्धकांपैकी एक बनली आणि याबरोबरंच तिच्यासाठी अनेक दरवाजे खुले झाले.

आता चिनू फॅशन इंडस्ट्रीतील एक मॉडेल बनली होती. मग काय चिनूने फॅशन इंडस्ट्रीतील फॅशन ज्वेलरीतील कमतरता अनुभवल्या आणि तिच्या डोक्यात एका अनोख्या कंपनीच्या स्टार्टअपची कल्पना आली. यानंतर सुरू झाली ती ‘रुबंस’ नावाची कंपनी.

2014 मध्ये चिनूने या कंपनीची सुरुवात केली. एथनिक आणि वेस्टर्न अनेक प्रकारच्या ज्वेलरीज चिनूने स्टार्ट केल्या. 229 रुपयांपासून ते 10 हजार रुपयांपर्यंत प्रत्येक प्रकारची ज्वेलरी रुबंसमध्ये मिळते. गेल्या वर्षी या कंपनीचा टर्नओव्हर तब्बल 7.5 करोड एवढा होता. आज चिनू 25 कर्मचाऱ्यांना पगार देते. बेंगलोर मध्ये सुरू झालेल्या या कंपनीचा विस्तार आज आज हैद्राबाद आणि कोच्ची पर्यंत झाला आहे.