सर्वोच्च न्यायालयाने आरेबाबत दिला ‘हा’ महत्वाचा निर्णय

नवी दिल्ली : आरे कॉलनीतील वृक्षतोडीवरुन सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने आरे कॉलनीतील झाडे तोडण्यास तूर्तास स्थगिती दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र सरकारला यापुढे एकही झाड तोडू नका असा आदेश दिला आहे.

सध्या सुरु असलेली वृक्षतोड तातडीने थांबवून, यापुढे एकही झाड तोडू नका, असे निर्देश सुप्रीम कोर्टाने दिले. मुंबई हायकोर्टाने झाडे तोडण्यास दिलेली परवागनी, सुप्रीम कोर्टाने स्थगित केली. त्यामुळे पर्यावरणवाद्यांच्या लढ्याला तूर्तास यश आलं आहे.

आरे वृक्षतोडीला विरोध करणाऱ्या ज्या कार्यकर्त्यांची अद्याप सुटका झालेली नाही, त्यांना त्वरित सोडण्याचे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाला प्रतिवादी करण्यासही सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 21 ऑक्टोबरला होणार आहे.

हायकोर्टाच्या आदेशानंतर विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी सरन्यायाधीश आणि राष्ट्रपतींना पत्र पाठवलं होतं. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने स्वत:हून याप्रकरणाची दखल घेत आज तातडीने सुनावणी केली. कोर्टात विद्यार्थ्यांकडून ज्येष्ठ वकील संजय हेगडे यांनी तर महाराष्ट्र सरकारकडून तुषार मेहता तर मुंबई मेट्रोकडून मनिंदर सिंह यांनी कोर्टात युक्तीवाद केले.

मुंबई मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी वृक्षतोड करण्याचे सर्व आक्षेप मुंबई उच्चन्यायालयाने शुक्रवारी (4 ऑक्टोबर)फेटाळून लावले. त्यानंतर त्याच रात्रीपासून आरेमध्ये वृक्षतोड करण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत आरेतील अनेक झाडं कापण्यात आली आहेत. 

महत्वाच्या बातम्या-