‘बंड थंड करण्याची ताकद माझ्यात आहे पण…’ -उद्धव ठाकरे

मुंबई | शिवसेना विरुद्ध शिंदे गट यांच्या अनेक याचिकांवर सध्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) खटला चालू आहे. यात शिवसेना आणि शिंदे गटाच्या वकीलांमध्ये मोठी खडाजंगी सुरु आहे.

त्याच दरम्यान शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मातोश्रीबाहेर कार्यर्त्यांसोबत संवाद साधला. यावेळी त्यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा (J. P. Nadda) यांच्या वक्तव्यावर बोट ठेवत टीका केली.

यापूर्वी शिवसेना फोडण्याचे प्रयत्न झाले. परंतु आता शिवसेना संपविण्याचे प्रयत्न सुरु आहेत, असे ठाकरे म्हणाले. जे. पी. नड्डा शिवसेना संपविण्याच्या मार्गावर असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

अनेक आव्हाने पायदळी तुडवत शिवसेनेने आपला झेंडा रोवला आहे. राजकारणात विजय आणि पराभव होत असतात, परंतु पक्ष संपविण्याचीच भाषा केली जात असल्याचे ठाकरे म्हणाले. बंड याआधीही झाले असून मी त्यांना सामोरं गेलो आहे. हे बंड थंड करण्याची ताकद माझ्यात आहे पण आता राजकारणात मुळापासून संपवण्याचा डाव सुरू आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

शिवसेनेची सध्या तीन पातळ्यांवर लढाई सुरु आहे. रस्त्यावरच्या लढाईत आपण कुठेही कमी पडणार नाही, दुसरी लढाई न्यायालयात सुरु आहे आणि तिसरी आणि महत्वाची लढाई म्हणजे शिवसैनिकांचे शपथपत्र आणि सदस्य नोंदणी असल्याचे ठाकरे यांनी म्हटले.

न्यायलयातील लढाईवर बोलताना ठाकरे म्हणाले, न्यायदेवतेवर माझा विश्वास आहे. यावेळी त्यांनी नड्डा यांच्या भाषणावर चांगली टीका केली. जे दुसऱ्याला संपविण्याची भाषा करतात, ते सर्वात अगोदर संपत असतात, असे ठाकरे म्हणाले.

भाजप घराणेशाही विरोधात उभी आहे. मी बाळासाहेब ठाकरेंचा (Balasaheb Thackeray) मुलगा आहे. पण भाजपचा वंश नेमका कोणता? सर्वजण रेडीमेड आहेत. भाजप वंश विकत घेत आहे. भारतीय जनता पक्ष (BJP) काय आहे? तर त्यांच्याकडे 30-30 वर्षे दुसऱ्या पक्षात काम केलेले लोक आहेत. त्यांच्याकडे स्वत:चे काही नाही. भाजपकडे राजकीय वंश नाही, विचारसरणी नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

‘भाऊ पंतप्रधान तर मी उपाशी मरायचं का?’, पंतप्रधान मोदींच्या भावाचेच मोदी सरकारविरोधात आंदोलन

हल्ल्यानंतर उदय सामंत आक्रमक, ट्विट करत म्हणाले….

उदय सामंतांच्या गाडीवर हल्ला, नवा वाद पेटणार?

“कोरोना लसीकरण मोहीम संपल्यावर लगेच CAA लागू करणार…”

अजित पवारांनी उडवली शिंदे सरकारची खिल्ली, म्हणाले…