“आमच्यावर टीका करणार्‍यांनी आधी स्वतःच्या रक्तातील भेसळ बघावी”

मुंबई |  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात शिवसेनेने शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा म्हणून विमा कंपन्यांवर धडक मोर्चा काढला आहे. मात्र विरोधकांनी या मोर्चावर सडकून टीका केलीये. मात्र आमच्यावर टीका करणार्‍यांनी आधी स्वतःच्या रक्तातील भेसळ बघावी, असं प्रत्युत्तर उद्धव ठाकरेंनी दिलंय.

वांद्रे कुर्ला कॉम्पलेक्समधील ‘भारती एक्सा’ या कंपनीच्या कार्यालयावर शिवसेनेने हा मोर्चा काढला होता. या मोर्चात शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सामिल झाले होते.

सर्व बँकांना, विमा कंपन्यांना 15 दिवसांची मुदत देतोय, 15 दिवसात सर्व कर्जमुक्ती झालेल्या शेतकर्‍यांना पैसे मिळालेचं पाहिजेत, असा इशारा उद्धव ठाकरे यांना दिला आहे.

जो शेतकरी आपलं रक्त आटवून आपल्यासाठी अन्न पिकवतो… आपली काळजी घेतो…. त्याची काळजी घेणे आपली जबाबदारी आहे आणि सरकारने ते कर्तव्य जबाबदारीने पार पाडलं पाहिजे, असं ते म्हणाले.

सरकार कोणाचंही असो, माणुसकी महत्वाची असते आणि माणुसकी जपणारी आम्ही लोकं आहोत. शिवसेनेने आजपर्यंत माणुसकी जपायचं काम केलंय आणि इथून पुढेही तेच काम शिवसेना करेन, असंही ते म्हणाले.

दरम्यान, भाजप-शिवसेनेचं राजकारण म्हणजे काळू-बाळूचा तमाशा आहे, असा हल्लाबोल राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी केला आहे तर शिवसेनेचा हा मोर्चा म्हणजे फक्त नौटंकी आहे, अशी टीका विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे.