आम्हाला तुझा अभिमान आहे; मुख्यमंत्र्यांकडून या तरुणाचं कौतुक

मुंबई | केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या एनडीएच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्रात पहिला क्रमांक पटकवलेल्या पियुष नामदेव थोरवे याने आपल्या पालकांसमवेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सह्याद्री अतिथीगृहात भेट घेतली. तेव्हा त्याच्या गळ्यात पुष्पहार घालून मुख्यमंत्र्यांनी त्याला जवळ घेतले, त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारत त्याच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

पियुष नाशिक पंचवटीचा राहणार असून त्याने नेव्हीमध्ये रुजू होण्याचे निश्चित केलं आहे. पुढच्या आठवड्यात तो प्रशिक्षणासाठी जाणार असल्याचेही त्याने सांगितले. १६ ते १९ वयोगटातील मुलांसाठी ही परीक्षा असते जी १२ वी नंतर द्यायची असते, अशी माहितीही त्याने यावेळी दिली.

पीयूषने उच्च माध्यमिक शिक्षण औरंगाबादच्या सर्व्हिस प्रिप्रेटरी इन्स्टिट्यूट येथून घेतले आहे. या यशानंतर नाशिक महापालिकेच्या वतीनेही महापौर रंजना भानसी व पदाधिकाऱ्यांनी पीयूषचा त्याच्या राहत्या घरी जाऊन गौरव केला होता. नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांच्यावतीनेही त्याला गौरविण्यात आलं होतं.

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केंद्रीय लोकसेवा आयोगाने घेतलेल्या एनडीएच्या परीक्षेत पियूष थोरवे याने देशात १६ वा आणि महाराष्ट्रात प्रथम क्रमांक पटकवल्याबद्दल त्याचे अभिनंदन केले आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

 

महत्वाच्या बातम्या-