हातावरचं शिवबंधन तोडून ‘घड्याळ’ बांधणाऱ्या निलेश लंकेना तिकीट मिळणार?? पारनेरच्या जागेवर ‘हे’ 3 इच्छुक

अहमदनगर |  पारनेर विधानसभेची जागा राष्ट्रवादीसाठी मोठी डोकेदुखी ठरणार आहे. राष्ट्रवादीकडे तिकीट 1 आणि इच्छुक उमेदवार 3 अशी काहीशी परिस्थिती झाली आहे. अहमदनगर जि.प. माजी उपाध्यक्ष सुजीत झावरे, पारनेर बाजार समितीचे सभापती प्रशांत गायकवाड आणि निलेश लंके यांच्यात उमेदवारीसाठी मोठी रस्सीखेच असल्याचं पाहायला मिळतंय.

दोन वर्षांपासून सुजीत झावरे आणि प्रशांत गायकवाड विधानसभेची जोरदार तयारी करत आहेत. मात्र काही महिन्यांपूर्वी आपल्या मनगटावरचं शिवबंधन तोडून हातावर घड्याळ बांधणाऱ्या निलेश लंके यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला.

निलेश लंके यांना राष्ट्रवादीत प्रवेश करण्यापूर्वी त्यांना उमेदवारीचं आश्वासन दिलं आहे. त्यामुळे त्यांना उमेदवारी नक्की मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. तर झावरे आणि गायकवाड दोघेजण विधानसभेसाठी इच्छुक आहेत आणि त्यांनी तशी तयारी देखील चालू केली आहे.

दुसरीकडे निलेश लंके यांना मिळणारा प्रतिसाद मोठा आहे आणि त्यांचा जनसंपर्क देखील दांडगा आहे. त्यांच्या पक्षप्रवेक्षावेळी चित्र राष्ट्रवादीसाठी सुखावणारं होतं. हीच बाब निलेश लंकेंना फायद्याची ठरेल  आणि दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होईल असं बोललं जातंय.

दरम्यान, शिवसेनेकडून विजयराव औटी यांची उमेदवारी फिक्स मानली जात आहे. पण राष्ट्रवादीसाठी कुणाला उमेदवारी द्यावी हा पेच आहे. विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे. लंके, झावरे की गायकवाड… राष्ट्रवादी कुणाच्या नावावर शिक्कामोर्तब करते हे येत्या काळात स्पष्ट होईल.